आता पाच वर्ष मीच पालकमंत्री असं ठणकावून सांगणारे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सत्कार समारंभात हे पद एक्सचेंज करु शकतो, असे विधान केले आहे. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचा जाहीर सत्कार नुकताच विविध संघटनाच्या वतीने करण्यात आला. यावेळी सावे-शिरसाट यांच्यात चांगलीच गट्टी जमल्याचे दिसून आले. वेळ आली तर आम्ही पालकमंत्री पद एक्सचेंज करू, पण दोघात तिसऱ्याला येऊ देणार नाही, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री करतांना तत्कालीन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी अशीच भूमिका घेत संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना तेव्हा विरोध केला होता. अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री करा, अशी शिफारस आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. सत्तार आणि माझ्यामध्ये तिसरा कोणी नको, असे भुमरे यांनी कन्नडमधील शिवसेनेच्या एका कार्यक्रमात म्हटले होते. या निमित्ताने पुन्हा त्या विधानाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद आपल्या मिळावे, अशी (Atul Save) अतुल सावे यांची देखील इच्छा होती. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत तसे प्रयत्नही त्यांनी केले. परंतु याआधी शिवसेनेचाच पालकमंत्री असल्याने हे पद त्यांच्याकडे कायम राहिले. संजय शिरसाट यांची या पदावर वर्णी लागली पण त्यांना असलेला पक्षांतर्गत विरोध विशेषतः माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून सुरूच आहे. डीपीडीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अब्दुल सत्तार शांत होते. पालकमंत्री शिरसाट यांनी देखील सयंमाने घेत वादाला हात घातला नाही. त्यामुळे डीपीसी बैठक शांततेत पार पडली.
शिरसाट आणि सत्तार यांच्यात दिलजमाई झाली की काय? अशा चर्चाही त्यानंतर सुरु झाल्या होत्या. परंतु सत्कार समारंभात शिरसाट यांनी पालकमंत्री पदावरून केलेले भाष्य हे अब्दुल सत्तार यांना डिवचण्यासाठीच होते हे स्पष्ट झाले. आमचा सत्कार हा लोकांनी पैसे खर्च करून केला आहे, पण काहीजण स्वतःचा पैसा खर्च करून बॅनरबाजी करतात आणि सत्कार करवून घेतात, असा टोलाही शिरसाट यांनी सत्तार यांना नाव न घेता लगावला.
मंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावे या दोघांनाही विधानसभा निवडणुकीत बराच त्रास झाला. विरोधक आणि पक्षांतर्गत अशा दोन्ही पातळ्यांवर या दोघांना लढावे लागले. आपापल्या भाषणात त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. संजय शिरसाट यांनी काहीजणांना तर आमदार झाल्यासारखं वाटतं होतं, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू शिंदे यांना लगावला. तर मलाही माझ्या मतदारसंघात खूप त्रास झाल्याचे सावे यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यामुळे हे दोन समदुःखी एकत्र आल्याची चर्चा कार्यक्रम स्थळी सुरू होती.

0 Comments